Thursday, July 20, 2023

स्वप्नजा !

 
कोण तू, माझी कुणी आहेस का?
स्वप्नजा.. जागेपणी आहेस का?

त्या सुगंधाचाच दरवळ आज.. अजुनी..
ब्रह्मकमळाची सखी आहेस का?

चाल नुपुरांची किती अलवार.. नाजुक!
चालुनी येते खरी आहेस का?

राग छेडी तार हृदयाचीच माझ्या..
अजुनी तू "रागा"वली आहेस का?

काल मज दिसलीस तू होती म्हणूनी..
आज वाटे, तू उद्या आहेस का?

---

का तुझा मी शोध घेतो पण, निरंतर?
सर्वस्व माझे व्यापुनी आहेस का?

राघव
[१९ जुलै २३]

Friday, July 15, 2022

कविता : तो पाऊस निराळा असतो..!

 पावसाकडे बघून आलेले हे विचार.. शेवटी आपण सर्व अनुभव मनानेच जगतो.
हा मनातला पाऊस कितीतरी वेगवेगळ्या रुपांत जाणवतो. रुपं अनेक आहेत, त्यातली काही मांडण्याचा एक प्रयत्न. :-)

रखरखत्या रेताड धरेचा येतो वर्षाकाळ..
मुरमाड मनाच्या मशागतीला मायेचा फाळ..
तो रुततो, खुपतो, नांगरट धरतो, आनंदे वर्षतो..
तो पाऊस निराळा असतो..

मनामनांतील भाव-धारणा जेणे अंगारती..
स्वराज्य विचारे उभ्या ठाकती, लक्ष-लक्ष ज्योती..
राष्ट्रभावना जागृत धरतो, मनगटांत वळतो..
तो पाऊस निराळा असतो..

राष्ट्र उभारावया प्रकटते पुरुषार्थाला साद..
कोटी-कोटी आहुती, गर्जती, प्रणवाचा नाद..
तो त्याग वर्षतो, सिंचतो, घडवतो.. राष्ट्र उद्धारतो..
तो पाऊस निराळा असतो..

----

उरातले ते शर काटेरी.. मुरवते जे पाणी,
त्या पाण्याची कावड निर्मळ, प्रेमार्द्राची वाणी..
मायेच्या अभ्रातून झरतो, रुजतो, ओथंबतो!
तो पाऊस निराळा असतो..

 

राघव
[२०२२]

Thursday, July 15, 2021

रेखाटन : ऐश्वर्या राय

 ४-५ वर्षांपूर्वी काढलेले हे एक फास्ट ड्राफ्ट आहे.. कधी पूर्ण केले नाही. बघुयात जमले तर पूर्ण करून लिंकेनच. पण तोवर.. :-)


राघव [२०१७]

Thursday, July 1, 2021

रेखाटन : बाबुजी.. एक रेखाटनाचा प्रयत्न..!

 

साद स्वरांची अलगद देते स्पर्श सुखाचा नवा..
नाद सुरांचा गाऊन जातो संध्याचळी मारवा!
गोड सुरावट सहज छेडती बोल अमृताचे..
ताल लयीचा तोल पेलती साज प्रेषिताचे!!

राघव

 [२००९]


 

कविता : शिल्पकार !

दगडाचा जन्म देवा, कधी कुणाला नसावा..
कसे जगणे म्हणावे, चटक्यांच्या जगण्याला..

दर्‍याखोर्‍यातून कितीदा, देह घरंगळलेला..
किती युगे उलटती, फक्त वाट पाहण्याला..

कुणी लाथ घातलेली.. कुणी उशाला घेतलं..
कुठे पडतांना तुटलं.. कुठं तुटतांना फुटलं..

इतकाल्या दगडांतून, निवडक उचलतात..
अन् रुक्ष आकारातूंन एखादाच घणतात..

छिन्नी-हातोडीचे घण.. टवक्यांना अंत नाही
घाव जागजागी पडती.. त्यात घडते विठाई!

--

दगडाचा देव होतो, त्यात कर्तुत्व कुणाला?
खरा शिल्पकार म्हणतो, दगडाचा गुण झाला!

राघव
[२०२१]

Saturday, June 5, 2021

लेख : अनुभव - १

बऱ्याच दिवसांपासून एखादे (कामाव्यतिरिक्त अवांतर असे) पुस्तक वाचायचे म्हणून ठरवत होतो. काल रात्री मोठ्या उत्साहाने (होय, ही एक अगदी खास सांगण्यासारखी गोष्ट आहे!) एक पुस्तक वाचायला बसलो. जेमतेम ५-६ पानं झाली असतील वाचून तर बाहेर आकाशातली वीज कडाडली अन् घरच्या वीजेने घाबरून अंधारात दडी मारली!! असला वैताग आला म्हणता की ज्याचं नाव ते! जातोय कुठे, बसलो अंधारात!!

हे नेहमी (माझ्यासोबत!!) असेच का होते म्हणून जरा "स्वतःला सहानुभुती" देण्यापासून ते "माणसाला अंधारातही दिसले असते तर काय बहार झाली असती!" इथपर्यंत बरेच विचार मनात एकदम "फास्ट ट्रॅक"ने येऊन गेले. ढगाळ वातावरण असूनसुद्धा जवळच कुठेतरी पायी चक्कर मारायला निघण्याचा मनसुबा मनात डोके वर काढत होताच, पण आपण बाहेर निघा अन् लगेच वीजूताईने वाकुल्या दाखवत परत या हे होऊ द्यायची माझी अजिबात ईच्छा नव्हती! पण काही-काही वेळाच अशा असतात की त्या आपला पुरेपूर अंत पाहतात!! आता जगात डास हा प्राणी(?) कशाला अस्तित्वात आला असावा हा प्रश्न मला नेहमीच पडतो. त्याचे मला पुन्हा मनापासून स्मरण व्हायलाच हवे, असे त्यास नेमके तेव्हाच का वाटावे?? शेवटी मुकाट उठलो जागचा, बाहेर चक्कर मारण्यासाठी!!

ढगाळ वातावरण अन् १०-१०.३० ची रात्रीची वेळ यामुळे तशी रस्त्यावर बऱ्यापैकी सामसूम होती. बेटे रस्त्यावरचे दिवे मात्र चांगले उजेड पाडत होतेत अन् तिकडे आमच्या कॉलोनीत अंधाराचे साम्राज्य! (लगेहाथ इलेक्ट्रीसिटी बोर्डावरही वैताग काढून झाला!) नाही म्हणायला रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून लोक अभ्यास कसा करत असतील, असा आगंतुक प्रश्नही मनात डोकावून गेला. पण मी त्या रस्त्यावरच्या दिव्याखाली बसलोय अन् पुस्तक वाचतोय, असे काहिसे न पचणारे वाचनप्रिय(!) विचार मनात आल्याबरोबर मूळ विचार एकदम रद्द करून टाकला! मुख्य रस्त्यावर एव्हाना कुत्र्यांची वर्दळ चालू झालेली दिसू लागली! बाकी आपल्यासारख्या वैतागणाऱ्या माणसांच्या रात्रीच्या झोपेचे खोबरे करण्यासाठीच ही भटकी कुत्री निर्माण केल्या गेलेली आहेत, अशी शंका गेले काही दिवस मला येऊ लागलेली.

रस्त्याच्या कडेने जात असताना दिसले, एका दिव्याच्या खाली थोड्या बाजुला एक म्हातारी भिकारीण तिच्या रात्रीच्या बिछान्याची तयारी करत होती. एक मरतुकडे कुत्रे तिच्या आसपास रेंगाळत उभे होते. त्या दिव्याच्या भोवती किड्यांनी कोंडाळे केल्यामुळे त्याचा प्रकाशही अंधुकसा होत होता. ठिगळं लावलेल्या दोन फाटक्या पिशव्या हीच तिची काय ती संपत्ती असावी. अंगावरल्या चादरीने(?) फुटपाथवरची थोडी जागा साफसूफ करण्याच्या प्रयत्नात ती होती. तेवढ्यात परत वीज जोराने कडाडली. त्याचबरोबर ते जागजागी फाटलेले तिचे कपडे अन् चादर बघून वास्तवातील प्रखरतेच्या त्या क्षणमात्र जाणिवेने मात्र, माझा वैताग धाडकन जमिनीवर येऊन आदळला. रात्री केव्हाही पाऊस पडेल असे वातावरण होते. त्यापरिस्थितीत पाऊस पडल्यावर ती काय करणार अन् कसा स्वतःचा बचाव करणार या विचाराने मन गलबलून आले. तिला वैताग होत नसेल का? तिची चिडचिड होत नसेल का? असे एक ना दोन अनेक प्रश्नांचं काहूर मनात दाटून आलं. म्हटलं ४ दिवस माझा वैताग होतोय तर माझी चिडचिड मला स्वतःला जाणवण्याइतपत वाढलेलीये.. अन् इथे तिला तर वैताग म्हणजे दररोजचा साथ-संगत करणारा मित्र होता.

सुन्न मनस्थितीत माझी पावले केव्हा घराच्या दिशेने वळलीत हे देखिल मला कळले नाही. घरी पोचलो तर वीज अपेक्षेप्रमाणे आली होती. पण आता ती वाकुल्या दाखवत नव्हती! निदान आजतरी पुस्तक वाचण्याची गरज राहिली नव्हती. क्षणमात्र का होईना, पण एक जिवंत बाड मी अनुभवून आलेलो होतो.

इत्यलम्

[ २००८ ]

लेख : आठवणी !

काही दिवसांपुर्वीची गोष्ट. नुकताच लग्न झालेला एक कलीग. जाम वैतागून, तावातावानं, "आयुष्यात काय काडीचा रस राहिलेला नाही.." असं वगैरे म्हणत, आम्हा सगळ्यांचं डोकं खात बसला होता. डोकं खात बसला होता असं म्हणण्याचं कारण म्हणजे, कुणी कितीही काहीही सांगितलं तरी याची ऐकायची काही तयारीच नव्हती. थोडक्यात त्याला जागं करणं शक्य नव्हतं! पण [कितीही मदत करायची ईच्छा असली तरी] उगाच ऐकून घ्यायला अन् कचरा डेपो व्हायला कुणाला आवडेल? मग आम्ही सगळ्यांनी मिळून एक प्लॅन बनवला.. दररोज, हा आला बोलायला, की कुणीतरी मागची एखादी चांगली आठवण काढायची आणि सगळ्यांनी मिळून त्यावर दंगा करायचा! त्यामुळे याचा सगळा मूडच बदलून जायचा आणि ना त्याचा कचर्‍याचा ट्रक व्हायचा ना आमचा कचरा डेपो! काही दिवसात त्याच्या अडचणी त्यानं स्वत:च सुधारणं सुरु केलं आणि एक जरा चांगलं वळण घेतल्या गेलं!

या अनुभवातून अनेक गोष्टी शिकण्यालायक आहेत खरंतर.. पण त्यावेळेस मनांत चमकून गेलेला विचार जणू चांगल्यापैकी कोरला गेलाय, आठवणींत!

आठवणी.. कितीही प्रयत्न केला तरी सामान्य माणूस थोडावेळ का होईना आठवणींत गुरफटतोच अधुन-मधुन! या आठवणी आपल्या आयुष्यात फार फार महत्त्वाची भूमिका बजावत असतात, सुप्त मनोवस्थेत.
जसं, कुणाला आपल्या लहानपणी मिळालेली वाईट वागणूक आठवणीत असते, सुप्त मनांत ती आठवण जागृत असते. त्यातून कुणी जगाप्रती अत्यंत कठोर बनतं तर कुणी अतिशय मृदु!

खरंच, आपण आपल्या छोट्याशा आयुष्यात काय केलं आजतोवर.. असा विचार करून बघीतलं तर..?
त्याही पलिकडे जाऊन, आपल्या आयुष्यातल्या चांगल्या/आनंदी आठवणी किती.. असा विचार केला तर?
सामान्यतः माणसाला आपल्या दु:खद आठवणी जास्त लक्षात राहतात. कारण सुप्त मनात त्या बर्‍यापैकी जागृत असतात. आनंदी आठवणी त्यामानानं कमी लक्षात राहतात. कमी जागृत असतात. पण म्हणजे, सुख-दु:खाचा समतोल हा नेहमी दु:खाच्या बाजूनंच कललेला असतो काय?

मला वाटतं सामान्यतः आनंदी घटनांना, त्या घडत असतांना, आपण पुरेसं recognize [मराठी?] करत नाही. जेवढं दु:ख आपण मनाला लावून घेतो, तेवढं महत्त्व आपण आनंदाला देत नाही. किंबहुना, दु:खच लक्षपूर्वक उपभोगल्या जातं.. सुख/आनंद तेवढ्या प्रमाणात नाही.
आता ज्या घटनांना, त्या घडत असतांनाच आपण तेवढं महत्त्व देणार नाही.. तर त्यांना सुप्त मन तरी कशाला तेवढं महत्त्व देईल? :-)

जर आनंदी/घटना प्रसंग. आपण जाणीवपूर्वक उपभोगले आणि दु:खी घटना/प्रसंग दुर्लक्षीत ठेवले तर...? हा दॄष्टिकोनातला बदल आहे आणि त्याला वेळ लागणारच. चांगलंच बघायचं वळण मनाला लावणं म्हणजे हेच असावं.. अर्थात् याचा अर्थ असा अजिबात नाही की दु:खद गोष्टी सरळ सोडून द्यायच्या.. पण मनाला त्यातूनही, जेवढं जमेल तेवढं, चांगलं काय ते शोधायला लावत राहायचं.
जरी अजूनही पुरेसं जमलेलं नाही तरीही, ही सवय खूप मोलाची ठरते एवढं मात्र मी स्वानुभवावरून सांगू शकतो.

जर असा बदल आपल्या दृष्टीकोनात आपल्याला करता आला तर, आयुष्य बरंच चांगलं होऊ शकेल.. आपलंही आणि आपल्या आजुबाजूच्या इतरांचंही, नाही?

इत्यलम्

[ २०२० ]

स्वप्नजा !

  कोण तू, माझी कुणी आहेस का? स्वप्नजा.. जागेपणी आहेस का? त्या सुगंधाचाच दरवळ आज.. अजुनी.. ब्रह्मकमळाची सखी आहेस का? चाल नुपुरांची किती अलवार...