Saturday, June 5, 2021

कविता : तुला ना कळे लोचनांची कहाणी..

जरी व्यक्त होती मनी आर्त गाणी..
तुला ना कळे लोचनांची कहाणी..

नदी-सागराची घडे भेट साधी..
तरी, अंतरी, छेडते सूर आधी!
शब्दांविना बोलते मूकवाणी..
तुला ना कळे लोचनांची कहाणी..

कधी भासती, भास झाले खरे हे!
कधी श्वास माझा उगा अडखळे रे!!
सुखाची दरी, ही अशी जीवघेणी..
तुला ना कळे लोचनांची कहाणी..

नको रे असा दूर जाऊ सख्या तू..
सुगंधाविना मोगरा पोरका तू..
सांगू कसे, का फुले - रातराणी!!
तुला ना कळे लोचनांची कहाणी..

राघव

[ २०१० ]

No comments:

Post a Comment

स्वप्नजा !

  कोण तू, माझी कुणी आहेस का? स्वप्नजा.. जागेपणी आहेस का? त्या सुगंधाचाच दरवळ आज.. अजुनी.. ब्रह्मकमळाची सखी आहेस का? चाल नुपुरांची किती अलवार...