Saturday, June 5, 2021

कविता : काळ थांबला कधीचा...

या दोन्ही कविता मी बर्‍याच आधी लिहिलेल्या आहेत. माझ्या एका जिवलग मित्राच्या मनःस्थितीचे वर्णन पहिल्या कवितेत करण्याचा प्रयत्न मी केलेला. सोबतची दुसरी कविता कदाचित त्या मनःस्थितीतून बाहेरची पडण्याची एक वाट असावी. किंचित बदल करून येथे प्रकाशीत करतोय.
आज तो सावरलाय पण त्यावेळचा त्रास सहन करणे त्याच्या सहनशक्ती पलिकडचे झालेले होते.

कसे रोधावे मनास, कसा सांभाळावा ध्यास..
मिणमिणता उजेड अन् अंधाराची कास.

दुःख सर्वत्र गर्दले, कोण कुणाचे कळेना..
तुझ्या सोबतीच्या जागी, दगा करतोय वास.

कसे अफुट उठले दव काळजाच्या पानी..
डोळे आटलेले तळे, थिजे विश्वासाचा श्वास.

दिन-रात एक सारे, विश्व निमाले क्षणात..
काळ थांबला कधीचा, नुरे जगण्याची आस.

-------------------------------------

मनी तेवतो प्रकाश, त्याला ग्रहण कशाचे?
मन आनंदस्वरूप, दुःख केवळ आभास.

प्रेम सांगेल तुजला पुन्हा प्रेमाची महती..
घाव पेलण्या दग्याचा जणू घडला अभ्यास.

वेड्या, वादळ निमाले, पुन्हा बांधूया डोलारा..
मायबापाच्या कुशीत पुन्हा अंकुरेल श्वास.

काळ थांबतो कधी का? त्याचा अनंत प्रवास..
फक्त, क्षणैक केवळ, तुला झालेला 'तो' भास.

[ २००८ ]

राघव

No comments:

Post a Comment

स्वप्नजा !

  कोण तू, माझी कुणी आहेस का? स्वप्नजा.. जागेपणी आहेस का? त्या सुगंधाचाच दरवळ आज.. अजुनी.. ब्रह्मकमळाची सखी आहेस का? चाल नुपुरांची किती अलवार...