Saturday, June 5, 2021

कविता : अवघे भरून आले..

 

सोडून सांजवेळी जाता कुणीतरी ते
घर मोकळेच होते.. अवघे भरून आले..

विसरावयास बसता आठव अचूक भिडतो
अवकाश पोकळीतील, अवघे भरून आले..

मायेस ओतणारी.. ती ऊब सांत्वणारी..
अवघे सरून गेले.. अवघे भरून आले..

होता मनात बहुदा तो शब्द ओळखीचा..
निरभ्र अभ्र सारे अवघे भरून आले..

--

त्या थोटकात पुन्हा हिरवाच कोंब होता..
नाविन्य पालवीतून अवघे भरून आले!



राघव

[ २०२१ ]

त्या संध्याकाळी अचानक काहीतरी निसटून गेल्याची भावना झाली.. ती हुरहुर अगदी टीपेची होती.. जशी आली तशीच गेली..! अत्यंत गहिरं आणि जड असं काहितरी मनाला भिडलं होतं हे मात्र खरं. डोळे मिटून थोडावेळ बसलो होतो. त्यावेळी मागे पाहिलेलं एक दृष्य डोळयांसमोर तरळून गेलं.. एका तोडलेल्या मोठ्या झाडाच्या उरलेल्या खोडातून, एका बाजुनं छोटीशी डहाळी पालवी घेऊन फुटली होती.. ते दृष्य आठवलं आणि मग मन जरा शांत झालं. त्या भावना शब्दांत मांडण्याचा हा प्रयत्न.

No comments:

Post a Comment

स्वप्नजा !

  कोण तू, माझी कुणी आहेस का? स्वप्नजा.. जागेपणी आहेस का? त्या सुगंधाचाच दरवळ आज.. अजुनी.. ब्रह्मकमळाची सखी आहेस का? चाल नुपुरांची किती अलवार...