Saturday, June 5, 2021

कविता : ऋण मातीचे..

ऋण मातीचे कसे विसरले? कुठे सोडली लाज मुलांनी?
पैशाच्या माजात गोठती श्वास कोवळे कणाकणांनी..

का अब्रुचे धिंडवडे अन् देहाचे बाजार निघावे?
व्यापाराचा बाज निराळा, पाप जोडती मणामणांनी..

चहुबाजूंना कोंदटलेली डबकी-नाल्या-उघडी गटारे,
एक झराही दुर्लभ झाला, घाण पसरते मणामणांनी..

वाट कुणाची बघतो आपण? स्वयंप्रेरणा कुठे निमाली?
मशाल जळावी प्रत्येकाची अज्ञानाच्या कणाकणांनी..

पहार बनुनी प्रहार करता ठिणग्यांची आरास उठावी,
घाव घालण्या दगडांवरती देह झिजावा कणाकणांनी..

शिवरायांची माती अपुली प्राण शिंपुनी मान* धरावा,
मातीमधुनी फुलत उठावे जीवन अपुले कणाकणांनी..


[ २००८ ]

राघव

No comments:

Post a Comment

स्वप्नजा !

  कोण तू, माझी कुणी आहेस का? स्वप्नजा.. जागेपणी आहेस का? त्या सुगंधाचाच दरवळ आज.. अजुनी.. ब्रह्मकमळाची सखी आहेस का? चाल नुपुरांची किती अलवार...